Saturday, August 11, 2012


रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना l असा भूत कालीन सिध्द्धांत जाणा ll
स्वराज्येछुने पाहिजे युद्ध केले l  रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ll
स्वातंत्र्ययज्ञ स्मरण
पुष्प 2.

२९ जून १९४३ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे टोकिओ आकाशवाणीवर एक भाषण:
“हिंदुस्तान स्वतंत्र करण्याचे कार्य आम्हा हिंदी लोकांचे आहे. ते फक्त आमचेच कार्य आहे. ही जबाबदारी आम्ही इतर कोणावरही टाकणार नाही; कारण राष्ट्राच्या इभ्रतीच्या दृष्टीने ते गैर होईल...
“परंतु शत्रू अत्यंत निर्दय असून बेफाम झालेला आहे. सर्वांगांनी टो शस्त्रसज्ज झालेला आहे. अशा भयंकर शत्रूविरुद्ध केवढाही नि:शस्त्र प्रतिकार, केवढाही घातपात, केवढाही क्रांतिकारक दहशतवाद पुरा पडणार नाही. म्हणून हिंदुस्तानातून ब्रिटीश सत्ता हाकून लावावयाची असेल तर त्यांच्यासारखीच हत्यारे आपल्याजवळ पाहिजेत. शत्रूने तरवार उपसलीच आहे---तर मग त्याच्याशी तरवारीनेच लढले पाहिजे.
“ मला विश्वास वाटतो की, पूर्व आशियातील माझ्या देशबांधवांच्या मदतीने मी प्रचंड सैन्य उभारीन, आणि त्याच्या बळावर हिंदुस्तानातून ब्रिटीश सत्तेला हाकून लावीन.. अखेरची घटका आली आहे. आता प्रत्येक हिंदी माणसाने रणांगणाची वाट धरली पाहिजे. स्वातंत्र्यप्रेमी हिंदी लोकांचे रक्त जेव्हा वाहू लागेल तेव्हाच हिंदी राष्ट्र स्वतंत्र होईल.”
-----------------
४ जुलै १९४३ परिषदेच्या प्राथमिक बैठकीत नेताजी:
“हिंदुस्तानात जे स्वातंत्र्यवीर लढत आहेत त्यांचे विश्वस्त म्हणूनच हिंदुस्तानाबाहेरील हिंदी देशभक्त कार्य करीत आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांना आश्वासन देतो की, आम्ही आजवर जे करीत आलो अथवा पुढे करू ते सर्व हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी होते व यापुढेही ते  स्वातंत्र्यासाठीच असेल. हिंदुस्तानच्या हितसंबंधास बाध येईल, हिंदी लोकमताला पसंत न पडेल अशे कोणतीही गोष्ट आम्ही करणार नाही.”
-------------------
   ५ जुलै १९४३, आझाद हिंद सेनेची अधिकृत उद्घोषणा, नेताजींचे भाषण:
“हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यसैन्यातील सैनिकहो,
माझ्या आयुष्यातील अतिशय अभिमानाचा असा हा दिवस आहे. हिंदुस्तान स्वतंत्र करणारे हिंदुस्तानचे सैन्य निर्माण झाले असे जगाला जाहीर करण्याचा अद्वितीय मान मला देण्याची ईश्वराची इच्छा आहे. एकेकाळी ब्रिटीशांच्या अंमलात असलेल्या सिंगापूरच्या रणांगणावर हे सैन्य लष्करी पद्धतीने रचलेले आहे. ब्रिटीश साम्राज्याच्या जोखडापासून हिंदुस्तानाची सुटका करणारे असे हे सैन्य आहे.... हे हिंदी सैन्य सर्वस्वी हिंदी नेत्यांच्या नेतृत्वाखालीच संघटित झाले असून जेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा तो ऐतिहासिक क्षण प्राप्त होईल त्यावेळी हिंदी नेत्याच्या हुकुमतीखालीच ते रणांगणावर जाईल.... ब्रिटीश साम्राज्याच्या स्मशानभूमीत आज उभे राहिलो असताना सर्वसमर्थ असे ब्रिटीश साम्राज्य हे भूतकालात जमा झाले आहे अशी एखाद्या लहान मुलालाही खात्री पटेल...
“ माझ्या सर्व सार्वजनिक आयुष्यभर एक गोष्ट नेहमी माझ्या मनास लागून राहिलेली असे, की इतर सर्व बाबतीत हिंदुस्तान स्वतंत्र होण्याला परिपक्व झाले आहे, पण एकाच गोष्ट कमी आहे ती म्हणजे स्वातंत्र्यलढा लढणारे सशस्त्र सैन्य ही होय. अमेरिकेचा जॉर्ज वॉशिंग्टन लढून स्वातंत्र्य मिळवू शकला याचे कारण त्याच्याजवळ सैन्य होते. गारीबाल्डीला इटालीचे स्वातंत्र्य मिळविता आले याचे कारण त्याच्यामागे सशस्त्र स्वयंसेवकांचे पाठबळ होते. हिंदुस्तानचे राष्ट्रीय सैन्य बनविण्यासाठी प्रथम पुढे येण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे....स्वत:च्या देशाला जे सैनिक स्वामीनिष्ठ राहतात, कोणत्याही परिस्थितीत जे कर्तव्यतत्पर असतात आणि आत्माहुतीसाठी केव्हाही तयार असतात ते सैनिक अजिंक्य ठरतात. तुमच्या अंत:करणात खोल जागी ही तीन ध्येये कोरून ठेवा.
“विश्वास असू द्या, की गडद अंधकार असो की प्रखर सूर्यप्रकाश असो, दु:खाचे डोंगर कोसळोत अथवा आनंदाच्या लहरी येवोत, यातना भोगाव्या लागोत अथवा विजयानंदाचा वर्षाव होवो—सर्व वेळी मी तुमच्या बरोबरच असेन. तूर्त भूक, तहान, यातना, सक्तीची चाल आणि मृत्यू याखेरीज मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. हिंदुस्तान स्वतंत्र झालेला पाहण्यास कोण जिवंत राहील हा मुद्दा मुलीच महत्वाचा नाही. हिंदुस्तान स्वतंत्र होणारच आणि त्या स्वातंत्र्यासाठी आम्ही सर्वस्वाचा होम करणारच. एवढा आत्मविश्वास असला म्हणजे पुरे. आमच्या या फौजेला ईश्वर आशीर्वाद देवो आणि आगामी युद्धात विजयी करो.”  

No comments:

Post a Comment