Tuesday, April 5, 2011

कबीर वाणी १

प्रिय मित्र वर्ग
कबिरांचा एक दोहा खाली देत आहे. त्यानंतर त्याचा सामान्य अर्थ देत आहे. व पुढे काही प्रश्न आपणासमोर ठेवीत आहे. आपले विचार कळवावेत ही विनंती.



कबीर वाणी



सिंहों के लेहंडे नहीं, हंसों की नहीं पात I

लालों की नहीं बोरीयां, साध न चलै जमात II



संत कबीर आवर्जून व स्पष्टपणे सांगताहेत की,

सिंह कधी कळप करून रहात नाहीत, हंस रांगा करून रहात नाहीत. रत्नांनी भरलेली पोती कधी आढळत नसतात. त्याच प्रमाणे साधू-महापुरुष हेही पंथ-संप्रदाय असा जमाव करून रहात नाहीत.



कबीर हे एक लोकोत्तर संत होऊन गेले. अत्यंत सामान्य पद्धतीचे जीवन जगले. व्यवसायाने कोष्टी. सतत कामात दंग. पण निरंतर नामस्मरण, तेही कोरडे नव्हे तर अत्यंत प्रेमपूर्ण. कोणत्याही कर्मकांडात न अडकता त्यांनी आदर्श असा कर्मयोग आचरणे पसंत केले. कर्म आचरीत असताना स्वत:चा लोप करीत त्यांनी आत्मसाक्षात्कार साधला. पण त्यानंतर समाजाला अत्यंत सरळ सोप्या भाषेत अध्यात्म समजावून सांगण्याचे व्रत अंगिकारले हे विशेष. कोणतेही बोजड उदाहरण न देता, व्यवहारातील, सर्वांना सहज कळतील अशी चपखल उदाहरणे घेत त्यांना जे सांगावयाचे आहे ते दोह्यांच्या माध्यमातून ते सांगत गेले.

या वर दिलेल्या दोह्यातून एक सहजसोपा पण मोलाचा संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे. सिंह एकटाच राहतो त्याला कळप करण्याची आवश्यकता वाटत नाही. हंस एकटाच आढळतो. त्यांच्या रांगा दिसून येत नाहीत. रत्ने ही दुर्मिळच असतात. ती खंडीभर वा पोतीभरून मिळत नाहीत. एखादे रत्न सापडले तर नशीब. पण कबीर संकेत मात्र अशा रीतीने करतात की रत्न हे एकट्यानेच आढळते, समूहाने नाही. आणि शेवटी या सर्व गोष्टींवरून ते सांगतात की साधू व महापुरुष हेही एकटे असतात, त्यांना जमावाची, संप्रदायाची वा पंथाची (स्थापन करण्याची) आवश्यकता भासत नाही.

स्वसामर्थ्यावर निर्भर असणाऱ्यांना उधार उसनवार शक्तीची गरज नसते. परमेश्वराने सिंहाला जे बळ जन्मात:च दिलेले असते त्या जोरावर त्याला वनराज ही पदवी आपोआप प्राप्त झालेली असते. त्यासाधी त्याला कोणता अभ्यासक्रम करावा लागत नाही की कोण्या विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र घ्यावे लागत नाही. म्हणून तर म्हटले जाते की ‘स्वयमेव मृगेन्द्रता’. त्या स्वबळाच्या जोरावर तो एकटा निर्भयपणे वावरू शकतो. इतरांच्या कुबड्यांची गरज घेणे त्याच्या स्वभावात नसते. समाजाच्या मान्यतेचा प्रश्न म्हणूनच त्याचेपुढे उभा रहात नाही. येणाऱ्या संकटांशी मुकाबला करायला ही आत्मनिर्भरता पुरेशी आहे.

परमेश्वराने हंसाला नीरक्षीर विवेक उपजतच दिलेला आहे. दूध व पाणी वेगळे कसे करावयाचे याचे ज्ञान त्याला परमेश्वर कृपेने उपजतच असते. त्यासाठी त्याला विशेष प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. तशी जरूरही पडत नाही. तो अलौकिक गुण माहित असल्याने त्या नादात हंस स्वत:च्याच आनंदात मग्न असतो. त्यामुळेच त्याला अन्य बांधव व मित्रांच्या सहवासावर अवलंबून राहण्याची निकड वाटत नसावी. आंतरिक सामर्थ्याने तो आत्मतृप्त असतो.

रत्न हेही विपुल संख्येत सापडत नाही. मुळात आधी कोणतेही रत्न व हिरा तसा सापडायला दुर्मिळच. त्यात तो विपुल संख्येने उपलब्ध असणे अधिकच अवघड. कबिरांचे म्हणणे असे की रत्न एकटेच असणे पसंत करते कारण त्याला सहवासासाठी अन्य रत्नांची आवश्यकता नसते. त्याच्या असण्याला इतर रत्ने असण्यानसण्याशी काहीच सोयरसुतक नसते. त्याच्या तेजाशी इतरांचे असणे नसणे याचा काहीच संबंध नसतो. याचे कारण कबीरांच्या मते त्या रत्नाचे आंतरिक तेज हेच आहे. इथे कबीरांनी रत्नाला सिंह व हंसाप्रमाणे सजीव करून टाकले आहे.

हे सगळे दृष्टांत देउन झाल्यानंतर संत कबीर साधुपुरुषांची गोष्ट करतात. ते सांगतात की साधुपुरुषांना (त्यांच्या अस्तित्वासाठी) जमाव करण्याची जरुरत नसते. ते आत्मसामर्थ्याच्या प्रभावात मग्न असतात. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी समाजाच्या सहवासाची आवश्यकता पडत नाही. ते एकटे राहू शकतात. किंबहुना ते एकांतात अधिक रमलेले दिसून येतात. म्हणूनच सिंह, हंस व रत्नांचे एकटेपणाचे दृष्टांत त्यांनी आधी दिलेले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद अशी असंख्य उदाहरणे हा डोह सिद्ध करतात. हिमालयात अनेक साधुपुरुष, ऋषी मुनी तप्साधानेत दंग असतात. त्यांना आत्मसाक्षात्काराचे आधी वा नंतर समाजापेक्षा एकटे राहण्यात अधिक स्वारस्य असते.

इथपर्यंत आपल्याला कबीर पूर्णपणे पटतात. आत्म-सामर्थ्यावर निर्भर असणाऱ्यांना समाज हवाच असतो, मान्यतेसाठी वा स्व-अस्तित्वासाठी जमाव वा इतरेजन यांची आवश्यकता पडत नाही. त्यांची अंतर्गत उर्जा त्यांना जीवनप्रेरणा देत असल्याने बाह्य प्रेरणांची/साधनांची त्यांना जरूर लागत नाही. ते सतत त्या आत्म-मग्नतेच्या धुंदीत मस्त असतात. त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची हाव नसते, प्रमाणपत्राची गरज नसते. ज्ञानतृप्त अवस्था त्यांना कायम स्वरूपाची लाभलेली असते.

मान्य. एकदम मान्य. मग हे संत / साधुपुरुष समाजात कशासाठी येतात? समाज प्रोबोधन कशासाठी करतात? अनेकवेळा त्यांचे उपदेश म्हणजे अरण्यरुदन ठरते, तरीपण ते उर्वरित जीवन हा खटाटोप करण्यात वाया का घालवतात? स्वत: कबीर समाजाला समजावत का बसले? वर लिहिलेले सर्व संत समाजाच्या उद्धारासाठी का खपले? अगदी त्या समाजाने त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली तरी? ते जर समाजाशिवाय एकटे राहू शकत होते, पंथ-संप्रदाय यांची त्यांना गरज नव्हती तर ते हा सारा उपद्व्याप का करत बसले? लौकिकदृष्ट्या त्यांना त्रासाच झाला तरीही त्यांनी समाजाला जागे करण्याचे व्रत जीवनभर का पाळले? विसोबा खेचर संत ज्ञानेश्वरांना, मंबाजी संत तुकारामांना दीर्घकाळ त्रास देत होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव अशी ग्रंथसंपदा समाजासाठी निर्माण केली, संत तुकारामांनी सर्वांसाठी गाथा लिहिली (जी समाजकंटकांनी एकदा इंद्रायणीत बुडवलीही होती). सम्प्पूर्ण जीवनभर त्रास सहन केलेले संत ज्ञानेश्वर सर्वांच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाकडे पसायदान मागतात. हे सर्व ते का करतात? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. त्यावेळी ते एकांतात आत्ममग्न अवस्थेत का राहू शकले नाहीत. कबीरांच्या म्हणण्याप्रमाणे अशा संतमंडळींना समाजाची आवश्यकता नसताना ते समाजात सतत का बरे वावरत होते? कोण बरोबर, कबीर की संत मंडळींचे समाजासाठी खर्च केलेले सक्रीय आयुष्य बरोबर? आपले काय मत आहे. कळवाल का?

No comments:

Post a Comment