Thursday, September 25, 2014

मुलाच्या स्मृतीसाठी !



मुलाच्या स्मृतीसाठी !
फिकट सुती अशा साध्या पोशाखातील एक महिला, घरगुती कापडातून शिवलेले आणि आता विरलेले असे जुने कपडे परिधान केलेल्या आपल्या यजमानांबरोबर, बोस्टन येथे रेल्वेगाडीतून उतरली आणि बुजरेपणाने चालत चालत, भेटीची वेळ न ठरवताच, हार्वर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या बाह्य कार्यालयात पोहोचली.
तिथल्या महिला सचिवाच्या क्षणात लक्षात आले की अशा जुनाट गावंढळ माणसांचे हार्वर्डमध्ये काहीच काम असणे शक्य नाही. तसेच केम्ब्रिजमध्ये  त्यांचे स्थान असण्याची शक्यता तर दूरच हेही तिने ओळखले.
“आम्हाला अध्यक्षांना भेटावयाचे आहे.” त्या व्यक्तीने अत्यंत विनम्रपणे सांगितले.
“ते दिवसभर खूप कामात असणार आहेत.” महिला सचिवाने फटकारले.                
 आम्ही थांबू तोपर्यंत.” ती महिला उत्तरली.
पुढचे अनेक तास त्या महिला सचिवाने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. तिला वाटले की शेवटी कंटाळून, निराश होऊन ती जोडी निघून जाईल. पण तसे झाले नाही आता ती महिला सचिवच अधिक अस्वस्थ व्हायला लागली. शेवटी तिने अध्यक्षांच्या कानावर ही गोष्ट घालायची ठरवली. खरे म्हणजे अगदी छोटयाशा कामासाठीदेखील त्यांच्या कामात हस्तक्षेप करणे तिला आवडत नसे.
“तुम्ही अगदी काही मिनिटांसाठी जरी तुम्ही त्यांना भेटलात तरी ते निघून जातील.” ती अध्यक्षांना म्हणाली.
रागाने एक सुस्कारा टाकून त्यांनी होकार दिला. साहजिकच आहे की त्यांच्यासारख्या महत्वाच्या व्यक्तीकडे अशा लोकांबरोबर घालवायला वेळ नव्हताच मुळी. बाहेरच्या कार्यालयात थांबलेल्या त्या पाहुण्यांच्या फिकट, विरलेल्या, जुनाट अशा अव्यवस्थित पोशाखांकडे पाहून अध्यक्षांच्या मनात त्यांच्याबद्दल एक प्रकारची घृणाच दाटून आली.
कठोर, उग्र चेहऱ्याने आणि आपली प्रतिष्ठा दर्शवीत अध्यक्ष आपल्याच तोऱ्यात त्या जोडीकडे चालायला लागले.
ती महिला त्यांना म्हणाली, “आम्हाला एक मुलगा होता ज्याने एक वर्ष हार्वर्डमध्ये व्यतीत केले होते. त्याला हार्वर्ड खूप आवडायचे. तो इथे खूप आनंदी असायचा. पण एका वर्षापूर्वी त्याचे एका अपघातात निधन झाले. माझे यजमान आणि मी त्याचे एक स्मारक इथे ह्या परिसरात उभे करू इच्छितो.”
अध्यक्षांच्या हृदयापर्यंत ते शब्द जणू पोहोचलेच नाहीत... प्रत्यक्षात त्यांना एक धक्काच बसला. “मॅडम,” कठोरपणे ते म्हणाले, “हार्वर्डमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि मरण पावलेल्या प्रत्येकासाठी असे स्मारक उभे करणे हे आम्हाला शक्यच नाही. आणि जर तसे काही आम्ही केले तर विद्यापीठाची ही जागा एखादी दफनभूमी म्हणूनच शोभून दिसेल.”
“अहो, तसे नाही,” ती महिला लगेच उत्तरली. “आम्हाला त्याचा पुतळा उभा करायचा नाहीये. आम्ही विचार केला होता की हार्वर्डला एखादी इमारत द्यावी.”
अध्यक्षांचे डोळे गर्रकन फिरले. त्यांच्या घरगुती विरलेल्या सुती कपड्यांकडे एक नजर टाकत अध्यक्षांनी आपले आश्चर्य व्यक्त केले, “एक इमारत! एका इमारतीची किंमत किती असेल याची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का? आम्हाला हार्वर्डमधील या फक्त इमारतींसाठी साडेसात दशलक्ष डॉलर्स ओतायला लागले आहेत.”
क्षणभर ती महिला स्तब्ध राहिली. त्या अध्यक्षांना बरे वाटले. यांच्यापासून आता तरी सुटका मिळेल असाही विचार त्यांच्या मनात डोकावून गेला.
 ती महिला आपल्या यजमानांकडे वळली आणि शांतपणे त्याना म्हणाली, “एखादे विद्यापीठ काढायला केवळ एव्हढेसे पैसे पुरतात? तसे असेल तर आपणच आपले असे एखादे विद्यापीठ सुरु केले तर?” यजमानांनी त्यावर आपली मान डोलावली.
आता मात्र अध्यक्षांचा चेहरा गोंधळाने आणि विमनस्कतेने कोमेजला.
श्रीमान आणि श्रीमती लेलंड स्टॅनफोर्ड उठले आणि चालायला लागले. पालो अल्टो, कॅलिफोर्निया येथे त्यांनी एक विद्यापीठ स्थापन केले ज्याला त्यांचे नाव दिलेले आहे. “स्टॅनफोर्ड विद्यापीठ”. आपल्या त्या मुलाच्या स्मृतीप्रीत्यर्थ  उभारलेले हे एक स्मारक, की ज्या मुलाची हार्वर्डने कधीच दखल घेतली नाही.
ह्यावरून तुम्ही सहजपणे एखाद्याचे चारित्र्य पारखू शकता की त्याची वागणूक इतरांशी कशी आहे की जे त्याच्यामते दर्जाने त्याच्याखाली आहेत.
 
 ------------------------------------------------------

No comments:

Post a Comment