Friday, December 31, 2010

' देखणे ते चेहरे ' - बा भ बोरकर

प्रिय मित्रांनो
एक वर्ष झाले लिहून , अन्य व्यवधाने होती . त्यामुळे हे मुक्त चिंतन मागे पडले . परत एकदा आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू म्हणतो .
प्रथम एक छान कविता लिहितो .
बा भ बोरकरांची कविता आहे . शीर्षक आहे ' देखणे ते चेहरे . ' आवडेल तुम्हाला !


देखणे ते चेहरे जे प्रान्जळIचे आरसे
सावळे की गोमटे या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा
वोळीती दु:खे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा
देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे
आणी ज्यांच्या लाघवाने सत्य होई कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुन्दराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातून जाता स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध ज्यां ये सूळ नेता स्वेछया
लाभला आदेश प्राणा निश्चये पाळIवया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पारयासारखे

देखणा देहांत तो जो सागरी सुर्यास्तसा
अग्निचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

बा भ बोरकर

आवडली ना ? प्रत्येक कडव्याला एक छान अर्थ आहे, एक सुयोग्य संकेत आहे .
अशी जीवने आपल्या आसपासही असू शकतात . आठवून तर बघा . आठवली तर इतरांसाठी लिहून पाठवा बरे, वाट बघतो !

No comments:

Post a Comment