Thursday, September 25, 2014

सख्या ज्ञानदेवा



सख्या ज्ञानदेवा ....(कै. शांता ज. शेळके)

सख्या ज्ञानदेवा अगा मायबापा
मला आज आला तुझा आठव
स्मरे जीवनाची तुझ्या आर्त गाथा
कसा लंघिला गाढ शोभार्णव

स्मरे ती तुझी मूक कोरान्नभिक्षा
तशा पोरक्या जीवनाची कळा
किती ताप प्राणांमध्ये साहुनीया
तुवा घोटिले तीव्र हालाहला !

स्मरे धर्म तो शब्द प्रामाण्यवादी
मनांच्या तशा जाहलेल्या शिला
अशा कर्मकांडामध्ये गुंतलेला
दिशाहीन आचार त्वा सोशिला

तरी व्यस्त सामाजिकांतूनही त्या
तुवा भाव जोपासले निर्मळ
तरारे जसे पद्म पंकामधूनी
तळीचे दुरी सारुनी कश्मळ !

किती साहिल्या वेदना तू तरीही
कुठे शब्द नाही कुडावाकुडा
किती थोर कारुण्य, कैशी तितिक्षा
उमाळा तुझ्या अंतरी केव्हढा !

स्त्रिया वैश्य शूद्रादिकांलागि साऱ्या
तुवा ज्ञान केले खुले मोकळे
मराठीचिये माळरानावरी या
तुवा पेरिले वांग्मयाचे मळे
किती काळ लोटून गेला तरीही
तुझी अमृताची झरे वैखरी
नवे दिव्य मानव्य येथे उदेले
सदा वारसा तो जणू अंतरी

तुझ्या पावलांची सख्या धूळ घेते
टिळा लाविते आदरे मस्तकी
तुझी ज्ञानदेवी मराठीत बोले
मराठी वसो तीच माझ्या मुखी !

     -------