Monday, March 7, 2011

Chetna : A Laboratory (VJTI Hostel)

चेतना – एक प्रयोगशाळा
सुरेश नाखरे
वीरमाता जिजाबाई तंत्र शिक्षण संस्थेत मी मे १९९४ मध्ये वसतिगृह प्रमुख म्हणून रुजू झालो. सरस्वती वाचनालय सुरु झाले व त्या अंतर्गत चेतना, गणेशोत्सव असे अनेक कार्यक्रम / उपक्रमही सुरु झाले. या कार्यक्रम / उपक्रमांची मुळात आवश्यकता का व कशी निर्माण झाली व ती आजही कशी महत्वाची आहे याचा योग्य पद्धतीने उहापोह करण्याची गरज कधी नव्हे इतकी आज निर्माण झाली आहे. ही प्रक्रिया कशी आहे, तिच्या मुळाशी कोणती मूलतत्वे आहेत, ती कशी राबवली जाते, या प्रक्रियेची फळे कशा प्रकारची आहेत, या प्रक्रियेला सातत्याने यश कसे प्राप्त होते हा खरे म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. पण हे काही समजावून घ्यायचेच नाही व कुठल्यातरी चुकीच्या मानीव व ऐकीव गोष्टींच्या आधारे ही प्रक्रियाच उखडून टाकावयाची असा प्रकार गेली दोन वर्षे सतत चालू असून त्यामध्ये अभिनिवेशाने भाग घेणाऱ्या शिक्षक-अधिकाऱ्यांची भरच पडत आहे हे एका अर्थाने दुर्दैव होय.
चेतना ही एक duplicating activity आहे. चेतना चे आतापर्यंतचे स्वरूप बदलून ते SocialSocial -PratibimbGroup चा एक भाग म्हणून चौथ्या दिवशी चेतना दिन अशा स्वरूपात साजरा करावा अशा विविध कल्पनाही पुढे आणल्या जात आहेत. चेतना च्या नावे असणारी अधिकृत Budgeted Amount सतत नाकारली जात आहे. जणू कोणी आपल्याच खिशातून ही रक्कम देते आहे. चेतनाला सभागृह मिळत नाही, सेमिनार रूम्स मिळत नाही, प्रांगण नाकारले जाते, रक्तदान शिबिरासाठी Textile Hall मिळत नाही. चेतनाला संस्थेत प्रसिद्धी करण्यास बंदी आहे, नुकतीच प्रायोजक मिळवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. जणू काही चेतना हे एक भयंकर मोठे संकट आहे, तो एक साथीचा रोग आहे, चेतना झाला तर संस्थेचे फार मोठे नुकसान होणार आहे अशी या विरोध करणाऱ्या शिक्षक अधिकाऱ्यांची व संचालकांची समजूत झाली आहे. मूळ कारण काय आहे ते सूज्ञांच्या लक्षात येईलच तो भाग वेगळा.
हे सर्व फार चांगल्या हेतूने घडते आहे अशी गोष्ट नाही. काही जण संचालकांच्या विरोधात कशाला जा अशा भूमिकेत आहेत पण हे उघड मान्य करण्याचे धैर्य नाही. मग विद्यार्थ्यांना उपदेशाचे डोस पाजण्यास तयार. म्हणूनच चेतना व तत्सम कार्यक्रम / उपक्रम नीट समजून घेण्याची आवश्यकता प्रकर्षाने आज निर्माण झाली आहे.
संस्थेचे दोन अडीच हजार विद्यार्थी – विद्यार्थिनी दरवर्षी चेतनाची उत्कंठेने वाट पाहतात व चेतना सुरु होताच त्यामध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, रक्तदान शिबीर अशा जवळ जवळ ४० प्रकारांमध्ये हे हजारो जण भाग घेतात. वसतिगृहाचे शंभरएक विद्यार्थी चेतना यशस्वी होण्यासाठी विविध समित्या व उपसमित्यांद्वारे समरसून काम करीत असतात. शेवटच्या दिवशी वसतिगृहातील ६०० विद्यार्थी , मेस-कर्मचारी व अन्य कर्मचारी, तसेच विशेष अभ्यागत मिळून ८०० ते ९०० जण क्रिकेट मैदानावर रात्रीचे भोजन एकत्र घेतात. मग इतक्या उत्साहात, शिस्तीत चालणारा बहुरंगी व चैतन्यपूर्ण चेतना होतो तरी कसा असे कुतूहल असलेल्यांनाही चेतनाच्या इतिहासात डोकावून पहावे लागेल.
म्हणूनच गेली १६ वर्षे चेतनाचा एक सक्रीय साक्षीदार राहण्याचे भाग्य लाभल्याने मी हा धावता आढावा घ्यायचे ठरविले आहे. यामुळे सर्वांची उत्कंठा भागेलच असे नाही पण बऱ्याच जणांचे प्रामाणिक प्रश्न व कुतूहल शमेल असे वाटते. निदान चेतनाचा विरोध थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल असे मानून मुद्दे लिहिण्यास घेतो.
1. १९९३ हे वर्ष संस्थेच्या दृष्टीने Ragging संदर्भात खूपच गाजले. एका पदविकेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यावर भीषण ragging झाले व त्याला भीतीने संस्था सोडून जावे लागले. राज्याच्या मुख्यसचिवाने तातडीने पावले उचलली. त्या वेळच्या प्राचार्यांना ताबडतोब मंत्रालयात बोलावले गेले व दोषी विद्यार्थ्यावर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले गेले. २४ तासात सदर दोषी विद्यार्थी संस्थेतून कायमचा निलंबित झाला. त्या काळात असे ragging चे प्रकार, संस्थेत, संस्थेच्या वसतिगृहात तसेच संस्थेबाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात होत होते. वसतिगृहातील काही गुंडपुंड विद्यार्थी या ragging प्रकारांमध्ये सक्रीय असायचे. संस्थेत Anti-ragging Committee होती. मी, माझे सहकारी शिक्षक, सुरक्षा कर्मचारी व काही ज्येष्ठ विद्यार्थी यात मनापासून काम करीत असत पण काही झाले तरी हे काम म्हणजे दिसली आग की विझव अशा प्रकारचे (fire-fighting) होते. मूळ उपाय होत नव्हता. साखळी तुटत नव्हती. प्रभावी उपाय सापडत नव्हता. काही तरी चुकत होते. काय ते कळत नव्हते.

अशा स्थितीत मे १९९४ मध्ये मी संस्थेच्या वसतिगृहात वसतिगृह-प्रमुख या पदावर रुजू झालो. वसतिगृहात रहावयास आलो. मित्रांनी प्रथम हे पद स्वीकारण्यास खूप विरोध केला होता. कुठे अडचणीत चालला आहेस. वसतिगृहाच्या आसपास असणाऱ्या बारमधली एकूण मिळणारी दारू वसतिगृहात सापडेल इथपासून ते मुलाबाळांचे नुकसान करून घेशील इथपर्यंत सर्व कारणे माझ्या तोंडावर त्यांनी फेकली. पण तरुण विद्यार्थ्यांमध्ये काम केल्याचा अनुभव व त्यांच्या कार्यशक्तीवर असलेला प्रचंड विश्वास या आधारावर मी येथे येण्याचा निश्चय केला व रहावयास आलो. १७ वर्षांच्या वास्तव्यात हा निर्णय चुकला असे मला व कुटुंबाला कधीही वाटले नाही आणि याचे सर्व श्रेय येथील विद्यार्थ्याना व त्यांनी वर्षानुवर्षे उत्साहाने चालू ठेवलेया विविध उपक्रमांना जाते. या विविध कार्यक्रम व उपक्रमांनी वसतिगृहाचे वातावरण उच्च दर्जाचे राहिलेच पण संस्थेच्या वातावरणामध्येही चांगल्याची भर पडली हे जवळून पाहणाऱ्याच्या ध्यानात येईल.

विषय थोडा दूर गेला. तर त्यावेळी म्हणजे १९९४ पूर्वी वसतिगृहाचे नेतृत्व गुंड-पुंड, अनेक वर्षे नापास होऊनही वसतिगृहात जणू आजीव सदस्य असल्याप्रमाणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे होते. हे विद्यार्थी व्यसनाधीन होतेच पण त्यासाठी लागणारा पैसा गरीब सुसंस्कृत विद्यार्थ्यांकडून दमदाटी करून लुबाडण्यात येई. त्यांचा उर्वरीत वेळ ragging, मारामाऱ्या, दमबाजी अशा उद्योगात जाई. त्यांचेवर कठोर कारवाई करण्यास वसतीगृह अधिकारी तयार नसत म्हणा वा त्यांच्यामध्ये सद्गुण अतिरेक होता म्हणा किंवा ते दुर्बल होते म्हणा पण त्यामुळे हे विद्यार्थी अधिकच मस्तवाल झाले होते. मला मात्र प्राचार्य, विभागप्रमुख, अनेक विभागांतील काही ज्येष्ठ शिक्षक यांचा पाठिंबा मिळाल्याने या मस्तवाल विद्यार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाई करता आली. एका अर्थाने स्वच्छता मोहीम राबविता आली. अनेक अपात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहातून हाकलण्यात आले. व्यसनांवर पूर्ण बंदी घातली गेली. कठोर नियम लागू झाले. Raggging मध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून व संस्थेतूनही निलंबित करण्यात आले. प्रकरण उच्च न्यायालयातही गेले पण न्याय संस्थेच्या बाजूनेच लागला. राज्यामध्ये नंतर जो Anti-ragging Act लागू केला गेला त्यासाठी या केसेसचा व संस्थेचा फार मोठा प्रत्यक्ष हातभार लागला होता हे नीट लक्षात घेतले पाहिजे. गेली १५-१६ वर्षे ragging नावालाही उरले नाही, ना संस्थेत ना वसतिगृहात. साखळी तुटली. व्यसनांनाही आपला गाशा गुंडाळावा लागला.

पण केवळ कठोर कारवाई व कायद्याचा बडगा कायमस्वरुपी ठरू शकत नाही हे लक्षात आले. चांगल्या कार्यक्रमांची / उपक्रमांची जोड जर दिली गेली नाही तर पोकळी राहील व जुनी दुखणी परत पाय पसरतील हे ओळखायला फार मोठी बुद्धी आवश्यक नव्हती व नाहीही.

2. आजची शिक्षणपद्धती, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ इतका प्रचंड वेळ classrooms & laboratories यांमध्ये जखडून ठेवते. अभ्यासक्रमामध्येही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याची तरतूद नाही. ही गोष्ट कोणत्याही विचारशील व संवेदनाशील शिक्षकाला मान्य होणारी आहे. विद्यार्थ्यांच्या या तरुण वयात त्यांचातील सुप्त सद्गुण व सुसंस्कार जागे व्हावेत, त्यांच्या शरीर-मन-बुद्धी इत्यादींचा सर्वतोपरी विकास व्हावा हा उद्देश्य पूर्ण करण्यास या अपुऱ्या शिक्षण पद्धतीस विविध प्रकारच्या कार्यक्रमांची व उपक्रमांची खूप मोठी आवश्यकता असते. काही प्रमाणात ही गरज संस्था Technovanza, Social-Pratibimb & Enthusia या उपक्रमांतून पूर्ण करतेही. पण हे सर्व कार्यक्रम एकतर एकूण १ महिन्यात संपतात, तसेच यात बराचसा भाग आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचा वा आंतरविभागीय स्पर्धांचा असतो. म्हणजे संस्थेतल्या केवळ ५ % विद्यार्थ्याना यात भाग घेता येण्याजोगी शक्यता असते. म्हणजेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने हे उपक्रम फारच अपुरे आहेत हे लक्षात येते.

3. वसतिगृहातील विद्यार्थी स्वत:च्या घरापासून दूर राहतात. आई-वडील यांचे प्रत्यक्ष नियंत्रण त्यांचेवर फारच कमी किंवा नगण्य असते. मोकळा वेळ बराच असतो. मुंबईसारख्या मायानगरीत हा वेळ मजेत घालविणे याची पूर्ण मोकळीक या विद्यार्थ्यांना सहजच प्राप्त झालेली असते. मुंबई व उपनगरातून रोज येऊन-जाऊन करणाऱ्या विद्यार्थ्याना अशी सुसंधी फारच कमी असते. मुंबईत असणारे बार, चैनीची हॉटेल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, रेड लाईट एरीआज, विडीओ पार्लर्स, परमीट रूम्स अशी नादी लावणारी अनेक मोहाची व आकर्षणाची ठिकाणे त्यांच्यासाठी स्वागतसज्ज आहेत. पैशाचा चुराडा होतोच पण वाईट व्यसने लागतात ती कायमचीच. हीच व्यसने पुढे त्यांचे आयुष्य उध्वस्त करतात. अशा वेळी मोकळा वेळ सत्कारणी लागावा म्हणून या नियंत्रणमुक्त विद्यार्थ्याना सुयोग्य कार्यक्रमांची व उपक्रमांची किती मोठी आवश्यकता असते हे आणखीन निराळे सांगण्याची जरूर नाही.

4. सुमारे ६०० विद्यार्थी वसतिगृहात रहातात. हे विद्यार्थी निष्कारण विनाउद्योग राहिले तर वाईट प्रथा बोकाळायला फारसा वेळ लागणार नाही हे निश्चित. हे विद्यार्थी महाराष्ट्राच्या/ भारताच्या कानाकोपऱ्यातून येतात (प्रांतभेद, विभाग-जिल्हाभेद), ते निरनिराळ्या धर्माचे, पंथाचे, जातीचे असतात (धर्मभेद, पंथभेद, जातीभेद), वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरांमधले असतात (आर्थिक भेद, सामाजिक भेद), विविध सांस्कृतिक भेदांनी युक्त असतात, उद्योजक, नोकरदार, शिक्षक, सैनिक अशा विविध पेशांमधले असतात. शैक्षणिक स्तर अगदी भिन्न असतात. या सर्व भेदांच्या वर मात करून, छोटे छोटे घातक गट बनवण्याच्या स्वाभाविक प्रवृत्तींवर विजय मिळवून, एकसंध असे वातावरण निर्माण करावयाचे असल्यास रचनात्मक कार्यक्रमांची / उपक्रमांची जोड या विद्यार्थ्याना, विशेषत: १०-११ महिने एकत्र राहणाऱ्या या विद्यार्थ्याना आवश्यक ठरते.

5. हे विद्यार्थी बहुसंख्येने महाराष्ट्राच्या ग्रामीण वा निमशहरातून आलेले असतात. मराठी माध्यमातून शिकल्याने न्यूनगंड असतो. पण जे इंग्रजी माध्यमातून शिकून येतात त्यांचेही भाषाकौशल्य फारच खालच्या स्तराचे असते. एकूणच या विद्यार्थ्यांचा संपूर्ण गुणस्तर मुंबई व उपनगरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूपच कमी असतो हा सगळ्यांचाच अनुभव आहे. भाषा कौशल्य, सभाधीटपणा, वक्तृत्वकला, नेतृत्वकला, एकत्रित काम करण्याची कला, निर्णयक्षमता. वागण्यातला मोकळेपणा , धीटपणा या व अशा अनेक बाबतीत मागे असल्याने तसेच ज्या भागातून आले त्या भागाचा मागासपणा जोडीला असल्याने ते खूप बुजरे होतात. म्हणून या गुणांची वाढ होण्यासाठी वसतिगृहात काही विशेष उपक्रमांची आवश्यकता असते हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही.

6. आई वडील, कुटुंब, सगे सोयरे, नातेवाईक व समाज दूर ठेवून हे विद्यार्थी मुंबईसारख्या अनोळखी, Indifferent, पूर्ण व्यावसायिक शहरात, जिथे आपण व आपले कुटुंब या व्यतिरिक्त विचार केला जात नाही अशा शहरात आलेले असतात. इथे सुधारणे सोडाच बिघडण्याची शक्यताच अधिक. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांच्या मागे पडलेल्या कौशल्य कलांना वाव देण्याला शक्ती व वेळ कोणाकडे आहे? म्हणून त्यांचा एकंदरीत स्तर किमान शहरी विद्यार्थ्यांइतका तरी राहील, त्यांचा बुजरेपणा जाईल, मुळात असणारा शुध्द रांगडा स्वभाव कायम ठेवून त्याला योग्य शोभणारे सुसंस्काराचे कोंदण तयार करील असे कार्यक्रम / उपक्रम वसतिगृहात राबवणे गरजेचे आहे हे विचारांती कोणालाही पटेल.

7. त्याचबरोबर इतरांच्या तुलनेत शैक्षणिक प्रगतीचा दर्जा (Academic Performance and Grade) सुद्धा उत्तम राहील याची काळजी घेण्याचीही आवश्यकता असते. अशा कार्यक्रमांत / उपक्रमांत नेतृत्व सोपवतानाच त्याचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे हे तपासून बघितले जाते. प्रत्येक पदांचे वाटप अगदी शैक्षणिक प्रगती उत्तम आहे असे बघूनच केले जाते. तसेच ही पदे / नेतृत्व पार पाडताना त्या दर्जाकडे दुर्लक्ष होणार नाही ना यावर लक्ष ठेवण्यास सांगितले जाते. किंबहुना असे नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा या निमित्ताने सहजच उपलब्ध होते. वसतिगृहा प्रमुख- ज्येष्ठ विद्यार्थी - विद्यार्थी नेते – विविध समित्या, उपसमित्या यांच्या माध्यमातून एक साखळी आपोआप तयार होते असा आजपर्यन्तचा अनुभव आहे. त्यामुळे वसतिगृहातून गेल्या १७-१८ वर्षात उत्तम दर्जा घेउन बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी आज किती मोठ-मोठ्या पदांवर विराजमान आहेत, देशात व परदेशात. आणि त्याचे सर्व श्रेय ते वसतिगृहातील या कार्यक्रमांना / उपक्रमांना कसे देतात हा खरोखरीच एक संशोधनाचा विषय आहे.

8. म्हणूनच वसतिगृहात एक रचना गेल्या अनेक वर्षात स्वाभाविकरीत्या प्रस्थापित झालेली आहे. प्रथम वर्षाचे विद्यार्थी वसतीगृह व संस्थेच्या अनेकविध कार्यक्रमांत / उपक्रमांत volunteer म्हणून भाग घेतील असे बघितले जाते. स्वत:च्या कोशातून बाहेर पडण्यासाठी हे आवश्यक ठरते. दुसऱ्या वर्षी हे विद्यार्थी वसतिगृहातील अनेक कार्यक्रमांत / उपक्रमांत नेतृत्व करतात. विविध कार्यक्रमांत / उपक्रमांत शे-दीडशे विद्यार्थी कार्यकर्ते या नात्याने भाग घेतात. अत्यंत जबाबदारीने, सर्व चांगल्या प्रथा सांभाळीत ते हे सारे कार्यक्रम ठराविक काळात यशस्वीपणे पार पाडतात. त्याच वर्षी ते संस्थेच्या सर्व कार्यक्रमात क्रियाशील कार्यकर्ते म्हणून दुय्यम स्तरावर जबाबदारीने काम करतात. तिसऱ्या वर्षी हे कार्यकर्ते संस्था स्तरावर नेतृत्व करण्यास सज्ज होतात. त्याही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतात. त्याच वेळी वसतिगृहातील दुसऱ्या वर्षीच्या नेतृत्वाला मार्गदर्शनही करतात. चौथ्या वर्षी हे विद्यार्थी संस्था व वसतिगृहातील नेतृत्वाचे पालक म्हणून, मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. तसेच निरनिराळ्या प्रवेशपरीक्षांची जोरात तयारीही करतात. ही एक यशस्वी परंपरा आपोआप निर्माण झाली आहे.

9. वसतिगृहात ‘स्वच्छ’, ‘पारदर्शी’, व ‘सद्हेतूंनी युक्त’ असे नेतृत्व तयार होते. त्यांच्या मनात वसतीगृह आणि संस्था यांचेबद्दल एक विशेष आत्मीयता आणि आस्था रुजलेली असते. सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे हे असंख्य विद्यार्थी संस्थेच्या सर्व कार्यक्रमांत / उपक्रमांत अत्यंत उत्साहाने, निरलसपणे, नि:स्वार्थीपणे सहभागी होतात. नेतृत्व करतात. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास याला साक्ष आहे. या सक्रीय सहभागामुळे व नि:स्वार्थी नेतृत्वामुळे संस्थेच्या सर्व कार्यक्रमांत / उपक्रमांत एक वेगळाच प्रभाव जाणवतो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मुळात गणेशोत्सव, चेतना असे कार्यक्रम / उपक्रम वसतिगृहातील नेत्यांनी संपूर्ण संस्थेतील विद्यार्थ्यांकरीता राबविले असल्याने संस्था विरुद्ध वसतीगृह हा अन्यत्र आढळून येणारा व घातक कलहाचे मूळ असणारा भेद इथे आपोआप अस्तित्वातच उरत नाही. तसेच प्रत्येक पैशाचा विनियोग व्यवस्थितपणे कसा करावा,विद्यार्थ्यांकडून जमा होणारा निधी हा भ्रष्टाचारमुक्त असा कसा वापरला जावा, वेळच्या वेळी हिशेब योग्य पद्धतीने व चोख पद्धतीने कसे सदर करावेत, प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी वातावरण सुयोग्य, नियमबद्ध, संयमित कसे राहील याची काळजी घेणे, पूर्व-नियोजन व पूर्ण-नियोजन कसे करावे, ही संस्था माझी आहे व म्हणूनच इथल्या प्रत्येक कार्यक्रमाला बट्टा लागणार नाही ही जबाबदारीही माझीच आहे या भावनेने डोळ्यात तेल घालून काम कसे करावे या सर्व गोष्टींची रंगीत तालीम वसतिगृहात आधीच झालेली असल्याने संस्थेचे कार्यक्रम यशस्वी व उच्च स्तरावर पार पडतात. आणि यापाठीमागे असणारे बहुसंख्य हात हे वसतिगृहातील सुसंस्कारानी गंधित झालेले असतात हे डोळे नीट उघडे ठेवले तर कोणाच्याही लक्षात आल्यावाचून राहणार नाही. फक्त मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा हवा. मोकळेपणा हवा. आणि हे सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्यावर श्रेयाची भाषा मात्र या देवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या तोंडी कदापीही आढळत नाही हे विशेष.

10. वरील सर्व मुद्यांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येईल की सरस्वती वाचनालय व त्या अंतर्गत दहीहंडी, १५ ऑगस्ट, गणेशोत्सव, दसरा, कोजागिरी, २६ जानेवारी, चेतना, गुढी पाडवा इ. अनेक कार्यक्रमांची आणि उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. इंजिनीअर अधिक काहीतरी चांगले, सर्वांगीण विकास, स्वच्छ व पारदर्शी नेतृत्वनिर्मिती, सुजाण नागरिक निर्मिती अशा अनेक संकल्पना इथे राबविल्या गेल्या त्या अशा अनेकविध कार्यक्रमांतून व उपक्रमांतून. ही प्रक्रिया आजही प्रचंड उत्साहाने राबवली जात आहे. त्याचा थेट प्रभाव संस्था व वसतीगृह या दोन्ही ठिकाणाचे वातावरण चांगले राहण्यावर निश्चितच पडला आहे हा भाग महत्वाचा. पण यापुढेही जाउन असे म्हणता येईल की ही प्रक्रिया अत्यंत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. इथून तयार होउन हे विद्यार्थी बाहेरच्या विश्वात निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर रुजू झाली. तिथेही त्यानी घेतला वसा टाकला नाही. आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वी पार पडतानाच सामाजिक भान सुटले नाही, मूल्यांशी प्रतारणा झाली नाही, बंधुत्वाची भावना अखंडपणे जपली गेली. आणि या साऱ्यांचे श्रेय त्यानी दिले ते या कार्यक्रमांना आणि उपक्रमांना. आजच्या तरुणांना चांगले मिळाले तर ते ग्रहण करण्यास सक्षम असतात हेच यातून पूर्वी सिद्ध झाले, आज सिद्ध होत आहे व भविष्यातही सिद्ध होईल. बाहेरच्या स्वार्थाने व अनेक गैरप्रथांनी अंधारलेल्या वातावरणात या आदर्श-विद्यार्थीरूपी निरांजनांनी संस्थेबाहेर पडल्यानंतरही आपापल्या परीने प्रकाश पसरविण्याचे पवित्र कार्य चालू ठेवले आहे हे विशेष. या गोष्टीचा सर्वांनाच अभिमान वाटावा अशी ही स्थिती आहे.

11. गतवर्षी चेतानासाठी संचालकांच्या मंजुरीने निश्चित झालेली रक्कम (budgetary amount)चेतनला देण्याचे संचालाकांकडूनच नाकारण्यात आली. I don’t recognize Chetana असे त्यांचे उद्गार होते. पण माजी विद्यार्थी मदतीला आले, त्यांचे चेतना चालूच राहिला पाहिजे असे असंख्य इमेल्स आले, आर्थिक मदत आली आणि चेतना’१० अजून मोठ्ठ्या स्वरूपात साजरा झाला. याचे कारण चेतना काय आहे हे या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. १९९५ पासूनच्या विद्यार्थीमित्रांनी आपापली मते सविस्तरपणे व स्पष्टपणे कळविली. कोणाच्यातरी दबावाखाली येण्याचे व आपली बुद्धी गहाण ठेवण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते हे जितके खरे तितकेच त्यांच्या आजच्या यशस्वी जीवनाच्या अनेक कारणांपैकी चेतना, गणेशोत्सव, सरस्वती वाचनालय या प्रयोगशाळांचे योगदान हे एक प्रधान कारण आहे हे स्वानुभवाने त्यांना पटले होते. ही सर्व पत्रे (emails) खरोखरीच मन लावून वाचण्यासारखी आहेत. हा एक संशोधनाचा विषयही होऊ शकतो. डोळे असून बघण्याचे धैर्य नसलेल्यांनी ही पत्रे मोकळ्या मनाने जरूर वाचावीत, दृष्टी स्वच्छ व्हायला मदतच होईल. बीज लावण्याची क्षमता नसणाऱ्यांनी निदान वटवृक्ष तोडण्याचे पाप तरी करू नये.

वास्तविक ज्या प्रक्रियेला इतके अफाट यश वर्षानुवर्षे मिळाले आहे, ज्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संस्थेचे दोन अडीच हजार विद्यार्थी आसुसलेले असतात, ज्या प्रक्रियेतून वसतिगृहातील विद्यार्थी आदर्श नागरिक बनण्याच्या वाटेवर चालायला सुरुवात करतात, स्वार्थापलीकडे जावून इतरांचा, समाजाचा, राष्ट्राचा, मानवतेचा विचार करण्यास प्रारंभ करतात, दरवर्षी ६००-७०० बाटल्या रक्त गोळा करून रक्तपेढीला देतात त्या प्रोटोटाईप प्रक्रियेला अभिमानाने संरक्षण देणे, तिच्या पाठीशी उभे राहणे हे खरे म्हणजे प्रत्येक सुजाण, संवेदनशील, सुसंस्कृत, नि:स्वार्थी, नि:पक्षपाती व दूरदर्शी व्यक्तीचे आद्य कर्तव्य असावयास हवे. निदान अडथळे आणण्याचे प्रयत्न तरी करू नयेत.


शिक्षण पद्धतीचे अपुरेपण बर्याच अंशाने पूर्ण करणारी ही दीपकलिका अखंडपणे तेवत राहावी हीच एक सदिच्छा व्यक्त करून हे पत्र पूर्ण करतो. इति लेखनसीमा !


सुरेश नाखरे
६-३-२०११
_________________________